News/Event






प्रा. जास्वंदी वांबूरकर यांचे संपादित पुस्तक -‘इतिहासातील नवे प्रवाह’


        इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण, इतिहास म्हणजे थोरामोठय़ांची चरित्रे, इतिहास म्हणजे वर्गसंघर्ष, इतिहास म्हणजे अन्वयार्थ अशा इतिहासविषयक विविध धारणा, कालक्रमात इतिहास ही संकल्पना किती बदलली, याची साक्ष देतात. आता इतिहास हा राजाची गोष्ट, लढाया, स्वातंत्र्य-आंदोलनाचे वृत्तांत इथपर्यंतच सीमित राहिलेला नाही, तर मानवी समाजाची सर्वागीण कहाणी बनला आहे. आता माणूस हा इतिहासलेखनाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे मानवी जीवनाशी निगडित सर्वच विषयांची चर्चा इतिहासाच्या कक्षेत होऊ लागली आहे. स्थानिक ते वैश्विक (local to global) असा सर्वस्पर्शी इतिहास आता आविष्कृत होत आहे.
         इतिहासविषयक नव्या प्रवाहांनी/पंथांनी इतिहास समृद्ध बनला आहे; तसेच त्याच्या संशोधनपद्धतीतही आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. नव्या प्रवाहांनी आणलेला बदल इतका विलक्षण आहे की, इतिहास या विद्याशाखेचा चेहरामोहराच त्याने बदलून टाकला आहे. अशा महत्त्वपूर्ण प्रवाहांचा परिचय करून देणारी पुस्तके मराठीत फारशी उपलब्ध नाहीत. प्रस्तुत पुस्तकाद्वारे ही उणीव दूर करण्याचा मानस आहे.
इतिहास या विषयात संशोधन करू इच्छिणा-या तरुण संशोधकांना या पुस्तकाद्वारे इतिहास या विषयातील नव्या प्रवाहांचा परिचय झाल्यास आपल्या संशोधनाची दिशा ठरवणे सुकर होईल. या ग्रंथातील सर्वच लेख आंतरविद्याशाखीय आहेत; कारण इतिहासाचे स्वरूपच मुळातून आंतरविद्याशाखीय होत गेले आहे. त्यामुळे या ग्रंथातील लेखांचा सामाजिकशास्त्रे व साहित्य यांच्या अभ्यासकांनाही उपयोग होईल. सारांश, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थीगण, संशोधक व प्राध्यापकवर्ग यांना एक चांगला संदर्भग्रंथ या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध होईल, असा विश्वास वाटतो. अन्य जिज्ञासू वाचकांनासुद्धा त्याचा लाभ घेता येईल.
       इतिहास हा मानवी अस्तित्वाइतकाच पुरातन आहे. केवळ मानवी समाजाचाच इतिहास लिहिला जातो. प्राणी-पक्षी व देव-दानव यांचा नव्हे. माणूस इतिहास का लिहितो? इतिहासलेखनाने काय साधले जाते? इतिहास ही जरी भूतकालाविषयीची मानवी कहाणी असली तरी ती वर्तमानातील गरजेतून साकारलेली असते. जसे प्रत्येक व्यक्तीचे नाव, गाव, कुटुंब, प्रदेश, राष्ट्र यांतून तिची ओळख निर्माण होते, तशी मानवी समाजाची व्यापक ओळख इतिहासातून होते. इतिहास व्यक्तीला/समूहाला अस्मिता प्रदान करतो व आत्मभानही देतो. इतिहासलेखन ही मानवी समाजाची मानसिक व बौद्धिक गरज आहे. मानव इतिहास घडवतो आणि इतिहासलेखनातून आपल्या अस्तित्वाचे, मानवी जीविताचे श्रेयस तो शोधत असतो. भूतकाळाचा संदर्भ सोडून जगणे आपल्याला शक्य होईल का? आर्थर मार्विक या तत्त्वज्ञाने म्हटले आहे, इतिहासाविना मानवी समाजाची अवस्था स्मृतिभ्रंश झालेल्या माणसासारखी होईल.
         इतिहास हा शब्दप्रयोग दोन अर्थानी केला जातो. एक म्हणजे घडून गेलेला भूतकाल आणि दुसरे या भूतकालाविषयीचे लेखन. या दोन गोष्टींना सांधत असते इतिहासलेखनशास्त्र. इतिहास हे एक शास्त्र आहे. इतिहास कसा लिहिला जातो? या विद्याशाखेची म्हणून एक संशोधनपद्धती आहे. इतिहासलेखनाची परंपरा जगभरात प्राचीन काळापासून होती; मात्र मानव्यविद्येतील एक विद्याशाखा म्हणून इतिहासाची उत्क्रांती पाश्चिमात्य देशांत प्रबोधनकालापासून (Renaissance) घडून आली. इतिहास म्हणजे भूतकालाविषयीचे ज्ञान. हे शास्त्रीय पद्धतीने कसे निर्माण करायचे? इतिहासाचे लेखन ऐतिहासिक साधनांशिवाय करणे अशक्य आहे.
    साधनांना इतिहासलेखनाचा कच्चा माल किंवा पाया म्हटले जाते. ज्या काळाचा शोध घ्यायचा, त्या काळात निर्माण झालेली साधने ही इतिहासलेखनाची प्राथमिक साधने असतात. ज्या घटितांचा अभ्यास करायचा, त्यांचा प्रत्यक्ष पुरावा या साधनांपासून मिळतो. नंतरच्या काळात निर्माण झालेले ग्रंथ इतिहासलेखनाची दुय्यम साधने मानली जातात. प्राथमिक साधनांची अस्सलता व विश्वासार्हता प्रस्थापित केल्यावरच साधने म्हणून त्यांचा वापर केला जातो. साधनांमधून जी तथ्ये दिसतात, त्याबरहुकूम इतिहास जसा घडला तसा मांडणे, हे इतिहासकाराचे कर्तव्य आहे, असे लिओपोल्ड फॉन रांके (१७९५-१८८६) याने मांडले. वस्तुनिष्ठपणे (objectively) इतिहासलेखन करणे हे इतिहासलेखनाचे ध्येय असले पाहिजे, हा विचार ज्ञानोदयकालापासून (enlightment) प्रभावी ठरू लागला. रांके ज्या काळात ही इतिहासविषयक मांडणी करत होता, त्या काळात जर्मनीत/युरोपात राष्ट्र-राज्य (nation-state) ही कल्पना युरोपीय राजकारणावर प्रभाव गाजवत होती. हेगेल, रांकेसकट सर्वच विचारवंतांची अशी श्रद्धा होती की, मानवी समाजाची प्रगती होण्यासाठी राष्ट्र-राज्य हे महत्त्वाचे आहे. याच काळात राष्ट्र-राज्याशी निगडित महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचे जतन करण्यासाठी अभिलेखागार स्थापन होऊ लागले. ‘इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण’ ही इतिहासविषयक संकल्पना प्रभावी बनली. ‘दस्तऐवजांमध्ये जे नसते, ते अस्तित्वात नसते,’ असे रांकेने जाहीर केले. रांकेच्या या धारणा युरोपीय इतिहासकारांच्या तीन पिढय़ांनी शिरोधार्य मानल्या. भारतातही शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाची परंपरा वासाहतिक काळातच सुरू झाली. त्यामुळे भारतातील इतिहासलेखनावर तब्बल दीडशे वष्रे रांके परंपरेचा प्रभाव होता. इतिहास म्हणजे राजकीय संघर्ष ही धारणा युरोपातील आणि भारतातील इतिहासलेखनाचे प्रमुख सूत्र बनले. युरोपातील व भारतातील प्रारंभीचे इतिहासलेखन पाहिले तर लढाया, संघर्ष, एकंदरीत राजाची गोष्ट इथपर्यंतच इतिहास सीमित झाला.
     १७ व्या शतकात झालेल्या वैज्ञानिक क्रांतीनंतर नसíगक शास्त्रांप्रमाणेच अर्थशास्त्र, इतिहास, यांसारख्या मानव्यविद्यांतील संशोधनासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, अशा धारणा प्रसृत झाल्या. शास्त्रीय संशोधनपद्धतीत अनुभवजन्य पुरावा, प्रयोग, अनुमान, निगमन व विगामी तर्कपद्धत (deductive and indeductive method) या गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले.
      विवेकनिष्ठा (reason) व प्रत्यक्षप्रमाणवाद (empricism) हे शास्त्रीय संशोधनासाठी अत्यावश्यक घटक बनले. या संशोधनपद्धतीने काही गृहीतके निर्माण केली- वस्तुनिष्ठ असे वास्तव अस्तित्वात असते. माणसाची सदसद्विवेकबुद्धी व ज्ञानेंद्रिये यांच्या सम्यक उपयोगाने या वास्तवाचे / बाहय़ जगाचे वस्तुनिष्ठपणे आकलन करणे शक्य आहे. मानवी स्वभाव हा वैश्विक असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला होणारे आकलन सारखेच असते आणि म्हणून ज्ञान हे वैश्विक असते. उदाहरणार्थ, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आपण जगाच्या पाठीवर कुठेही या नियमाची पडताळणी करून पाहू शकतो. वेगवेगळ्या राष्ट्रांतील अनेक माणसांनी एखादी वस्तू आकाशात फेकली तर ती खाली येते. हा प्रयोग आपण करून पाहू शकतो आणि आपले अनुमान एकच असते. ऑगस्त कॉम्ट (१७९८-१८५७) याच्या प्रत्यक्षार्थवादाने (positivism) ऐतिहासिक घटितांच्या अभ्यासातून मानवी समाजाविषयीचे नियम/सिध्दांत (’laws) मांडता येतात, अशी मांडणी केली.
       रांकेप्रणीत इतिहासलेखनपद्धतीची आणि ऑगस्त कॉम्टच्या प्रत्यक्षार्थवादाची चिकित्सा १८व्या शतकापासून सुरू झाली. इतिहास म्हणजे राजकीय घडामोडी आणि वर्णनात्मक इतिहास या कल्पनांना अतिशय प्रभावीपणे आणि पद्धतशीरपणे विरोध केला तो हेन्री बेर (१८६३-१९५४) आणि एनाल्स परंपरेचे अध्वर्यू असलेल्या ल्युसिन फेबव्र (१८७८-१९५६) व मार्क ब्लॉक (१८८६-१९४४) यांनी. घटिते म्हणजे समाजातील घडामोडींचा केवळ दृश्य भाग असतो. इतिहासाच्या हिमनगाचा अदृश्य भाग शोधून काढायचा तर अधिक सखोल दृष्टिकोनाचा अवलंब केला पाहिजे. ख-या अर्थाने मानवी इतिहास शोधून काढायचा असेल तर घटितांना प्रभावित करणारे, युगानुयुगे मानवी जीवनास आकार देणारे घटक – सामाजिक रचना, पर्यावरण, आर्थिक उलाढाली, सांस्कृतिक पैलू अशा सर्वच विषयांचे विश्लेषण केले पाहिजे; मानवी जीवनाला व्यापून राहणा-या सर्वच पैलूंचा समावेश करणा-या समग्र इतिहासाची मांडणी केली पाहिजे, असे एनाल्स परंपरेने अधोरेखित केले. इतिहास विषयाला आंतरविद्याशाखीय (interdisciplinary) करण्याचे श्रेय एनाल्स परंपरेला दिले पाहिजे. तिने विविध विद्याशाखांच्या संशोधनपद्धती, संज्ञा-संकल्पना आयात करून ऐतिहासिक संशोधनासाठी त्यांचा अभिनवपणे वापर केला. यातून इतिहास या विषयाची एक नवी संशोधनपद्धती विकसित झाली. दस्तऐवजांप्रमाणेच साहित्य, कथा, लोकसाहित्य, गाणी, मौखिक परंपरा यांचे इतिहासलेखनात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान असू शकते, याचे दिग्दर्शन त्यांनी केले. एनाल्स परंपरेचा इतिहासलेखनावर गहिरा प्रभाव पडला. यातूनच स्थानिक इतिहास, पर्यावरणाचा इतिहास, खाद्यसंस्कृतीचा इतिहास हे नवे प्रवाह विकसित झाले. केवळ समग्रलक्ष्यी इतिहास (macro-history) महत्त्वाचा नसून अंशलक्ष्यी इतिहास (micro-history) वा विशेष अभ्यास (case studies) हेही तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत, या भूमिकेतून नवनवे संशोधन पुढे आले.

No comments:

Post a Comment